Ad will apear here
Next
सातमाईंचे रान
‘सातमाईंचे रान’  ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत. 
.......... 
तसा आमच्या चिमुकल्या मांजरीवाडीत आमचा सातमाईंचा वाडा फार प्रतिष्ठित मानला जाई. माझ्या अंबाआजीचे आजोबांनंतर आमच्या सातमाईंच्या वाड्यावर व गावातदेखील वर्चस्व होते. गावात काहीही घडले, तरी सर्वप्रथम आमच्या वाड्यातच चर्चा करण्यासाठी गावबैठक भरत असे. आमच्या सातमाईंच्या त्या अभेद्य चिनी भिंतीच्या त्या दरवाज्यातून वाकून आत शिरले, की त्या दाराच्या उजव्या हाताला आमच्या खोत कुटुंबाच्या सर्व गाई-म्हशी व बैल अगदी ओळीने आपापल्या गोठ्यात दाव्याने खुंटीला बांधून ठेवलेल्या होत्या. समोरच्या दारापासून ते मागल्या दारापर्यंत अगदी चाळीसारख्या लांबलचक असलेल्या त्या सर्व गोठ्यातील जनावरांची जबाबदारी आमचा तातोबा म्हणजे आमच्या तातूवर होती. 

आमच्या प्रत्येकाचे गोठे आमच्या चुलीसारखे वेगवेगळे नव्हते, तर आमची गुरेढोरे एका काकांच्या गुराढोरांनंतर लांब आडवा बांबू बांधून लगेच दुसऱ्या काकांची गुरेढोरे त्यात ठेवलेली होती. म्हणजे तो लांबलचक एकच गोठा फक्त त्या आडव्या बांबूने दुसरा गोठा तयार करीत होता. आमचा तातू आमच्या ह्या सर्व जनावरांचे पाहायचा. तातूचा मुक्या जनावरांवर फार जीव होता. ती जनावरेही त्याच्याशी फार सलगीने वागत. ह्या आमच्या गोठ्यासमोर एक चाळीसारखी तीन दारे असलेली पातळ अशी भिंत बांधलेली होती. त्या भिंतीमुळे आमचा गुरांचा गोठा आमच्या वाड्यापासून थोडा दूर सरकला होता. तसे आमच्या गोठ्याजवळच आमच्या धान्याच्या कणग्यासुद्धा होत्या. त्या सहा चौकड्यांमधून म्हणजे कुठल्याही चौकडीच्या दारातून आत शिरले, की समोरच आमची शेणाने सारवलेली लांबलचक ओसरी लागत असे. ही ओसरी मात्र आमच्या सर्वांत मोठ्या ‘इरलीकाकू’च आपल्या सुरेख घट्ट गोल नक्षीने सारवून काढायच्या. कधी त्यांना बरे वाटत नसले, तर मात्र आमची आनंदीआत्या ती ओसरी नक्षी न काढता साधीच सारवून काढी.

ह्या शेणाने सारवलेल्या ओसरीच्या कडेकडेला सहा खांब उभे होते. संध्याकाळी त्या सहाही खांबांवर नेहमी एक-एक असे सहा कंदील उदासवाणे मिणमिणत असत. तशी आमची ही ओसरी वाड्यात फार महत्त्वाची होती. आमच्या ह्या ओसरीवर बहुतेक करून आमच्या वाड्यातील बायकांचाच तिन्ही त्रिकाळ वावर असे. या ओसरीवर आमची आजी, माझी आई, इरलीकाकू, मंगीकाकू, गुणाकाकू आणि कमळीकाकू ह्या तिन्ही त्रिकाळ काही ना काही उद्योग करीत बसलेल्या असत. आम्ही वाड्यातील सर्व भावंडे ह्याच ओसरीवर ओळीने बसून आजीच्या देखरेखीखाली अभ्यास करायचो, तिथेच बसून एकत्र खेळायचो, एकमेकींच्या वेण्या ओढून एकमेकांच्या पाठीत गुद्दे हाणून नंतर तिथेच बसून आजीच्या छान छान गोष्टी ऐकायचो, तर कधी आमच्या काकूंची हलक्या आवाजातली कुजबूज चोरून ऐकून आपापसात हळूच हसायचो. माझे बाबा व काका संध्याकाळी शेतावरून दमूनभागून घरी आले, की ते प्रथम ह्याच ओसरीवर जरा वेळ टेकून आपल्या आईशी म्हणजे आमच्या आजीशी बोलत. तिथेच पान खात खात वाड्यातील दिवसभराच्या घडामोडी ऐकत आणि नंतर आम्हा अभ्यासाला बसलेल्या पोरांच्या अभ्यासाची चौकशी करून ते लगेच आपापल्या चुलीजवळ बसून गरमागरम भाकरीबरोबर तिखट वालाच्या उसळीवर दही घालून जेवण्यासाठी पोरांसह त्या चौकडीच्या दारातून आपापल्या खोल्यांकडे जात. नंतर आजी उठून आनंदीआत्याच्या माजघरात गेली, की नंतर मात्र ती ओसरी त्या मंद कंदिलाच्या उजेडात मोकळीच राहत असे, कुणी तरी आपल्या जवळ येण्याची वाट पाहत.

आमच्या ह्या लांब-रुंद ओसरीनंतर त्या कंदिलाच्या खांबाच्या मागे आमच्या प्रत्येक कुटुंबाच्या सहा-सहा खोल्या होत्या. त्या सर्व खोल्यांचे सहा दरवाजे त्या कंदिलाच्या खांबाच्या उंबरठ्यावर उभे होते. प्रत्येक दाराआड त्या त्या कुटुंबाचा संसार उभा होता. एकदा त्या दारातून आत शिरले व समोरचे दार बंद केले, की नंतर सर्व कुटुंबे आपल्या मुलाबाळांसह स्वतंत्र होत असत. त्यानंतर कुणाचा कुणाशी संबंध राहत नसे. माझ्या आईने व आमच्या सर्व काकूंनी आपापल्या दारापुढची थोडीशी मोकळी असलेली जागा शेणाने छान सारवून त्या इटुकल्या जागेवर ज्वारीच्या पिठाने सुरेख रांगोळ्या काढलेल्या होत्या. तसेच त्या प्रत्येक रांगोळीजवळ कापसाचे तेल पिणारी मातीची एक पणती ठेवलेली होती. 

आमच्या आया संध्याकाळी ते समोरचे दार बंद करण्यापूर्वी आपापली पणती पेटवून ठेवीत. तेव्हा रात्रीच्या काळोखात त्या मिणमिणणाऱ्या कंदिलाच्या उजेडात त्या सहा पणत्या काजव्यासारख्या लुकलुकत, त्या कंदिलाशी कुजबुजत राहत. माझ्या आजीचा ह्या रांगोळी व पणतीवर फार कटाक्ष होता. जर आमच्या आयांपैकी कुणी कधीही रांगोळी काढण्यास किंवा पणती पेटवून ठेवण्यात हलगर्जीपणा केला, की आजी तिला बाहेर बोलावून लगेच म्हणत असे, ‘अगो पोरी, लक्ष्मी नेहमी भरलेल्या घरात राहते. ती रात्री थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून दाराबाहेरच्या ओसरीवर निवांतपणे टेकते. त्या वेळी तिला रांगोळी व पणतीचा मंद प्रकाश हवा असतो. नाही तर पोरी, ती त्या काळोखात चुकून दुसऱ्याच्याच घरात शिरायची. जा, अगोदर रांगोळी काढून पणती लाव व नंतर दार बंद करून घेऽऽ’ त्या वेळी हलगर्जीपणा करणारी तिची सून, ‘व्हय आये’ म्हणून रांगोळी काढून पणती पेटवून ठेवीत असे. 

आता आमच्या सातमाईंच्या कुटुंबाबद्दल मी तुम्हाला सांगते हं! माझे बाबा व काका आणि आमच्या आनंदीआत्याला धरून आम्ही एकूण सहा कुटुंबे! त्या गोठ्यात जशी आम्हा सर्वांची जनावरे एकत्र राहत होती, अगदी तस्सेच आमची ही सर्व कुटुंबे गुण्यागोविंदाने सातमाईंच्या वाड्यात राहत होती. आमच्या आजीने प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या वाटणीच्या सहा-सहा खोल्या दिलेल्या होत्या. ह्या सर्व खोल्यांमध्ये एक भिंतीचा आडोसा सोडला, तर आमच्या सर्व खोल्या एकमेकाला अगदी चिकटून ‘आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या’ ह्याप्रमाणे उभ्या होत्या. 

आमच्या सातमाईंच्या वाड्यातील छत्तीस मोठमोठ्या खोल्यांमध्ये माझ्या बाबांनी व काकांनी आपापले संसार थाटले होते. आमच्या सातमाईंची कृपा असलेला तो अंधारी वाडा आमच्या सहा भरलेल्या कुटुंबांसह, आमच्या जनावरांसह, आमच्या गोणीआडच्या भुतांसह व आमच्या अन्नधान्यासह त्या मोठ्या दगडी चिनी भिंतीमध्ये एखाद्या बंद बाटलीसारखा अगदी सुरक्षित होता. तशी आमच्या प्रत्येक घरांना पुढे व मागे दारे होती. तसेच मागीलदारी म्हणजे परसदारी मातीची छोटी अंगणे होती; परंतु हे सर्व त्या मोठ्या दगडी भिंतीआड अगदी सुरक्षित होते. 

आमच्या वाड्याच्या मागीलदारी म्हणजे मागे फार मोठ्ठी अगदी मोकळी जागा होती. त्या जागेपुढे आमचे झपाटलेले मोठ्ठे बाभळीचे रान होते. खरे तर सातमाईंच्या वाड्याच्या मागे असलेली ती तिथली सर्व जागा फक्त आमचीच होती. तिथेच थोड्याशा अंतरावर डाव्या हाताच्या बाजूला एक फार जुने असे मोठ्ठे कडुलिंबाचे झाड होते. त्या झाडाच्या भोवती अगदी गोलाकार असा दगडी पार बांधलेला होता. जसा गावातील वडाच्या झाडाला स्त्रियांना प्रदक्षिणा घालण्यासाठी व गावकऱ्यांना विसावा घेण्यासाठी पार बांधलेला असतो ना अगदी तस्साच पार त्या कडुलिंबाच्या झाडाभोवती बांधलेला होता.

त्या कडुलिंबाच्या पायथ्याशी एक लहानसा दगडाचा देवळासारखा चौथरा बांधलेला होता. तिथेच, आम्हा खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई राहत होत्या. आता राहत होत्या म्हणजे चौथऱ्याच्या आत आमच्या सातमाईंच्या अगदी एकसारख्या दिसणाऱ्या सात पितळी लहान मूर्ती होत्या व त्या प्रत्येक मूर्तीला एकाच लुगड्याचे तुकडे कापून लहान लहान लुगडी करून, तशाच लहान चोळ्या शिवून घातलेल्या होत्या. त्यांच्या हातात कासाराकडून मुद्दाम करून घेतलेल्या हिरव्या काचेच्या बांगड्या व गळ्यात लहान लहान सोनसाखळ्या होत्या. तसेच अंबाडा घातलेल्या त्यांच्या डोकीवर लुगड्याचा पदर घातलेला होता. ह्या सातही पितळी सातमाईंच्या मूर्तींचे एक मोठे वैशिष्ट्य होते. ह्या सर्व मूर्तींचे काळे डोळे अगदी जिवंत माणसांसारखेच होते. त्या डोळ्यांकडे पाहिले, की ते जिवंत डोळे आपल्याला निरखून पाहत आहेत असा उगीचच भास होत असे. 

(‘सातमाईंचे रान’ (भाग १) ही आयडा बॅरेटो यांची कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZPSCI
Similar Posts
इंद्रियधून चिनी सैनिकांच्या काळकोठडीतून सुटून त्सेवांग तिबेट सोडणाऱ्यांच्या जथ्यात सामील होतो. तिबेट ते नेपाळ या प्रवासात अनेक जीवघेणे थरारक प्रसंग येतात. त्यातूनही सहीसलामत बाहेर पडून त्सेवांग नेपाळला पोहोचतो. पुढे अनेक घडामोडींनंतर त्याचा भारतात प्रवेश होतो. प्रणव गायगवळी यांच्या लेखणीतून उतरलेली तिबेटी त्सेवांगची
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
काळोखातील सावली ‘काळोखातील सावली’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी जागृत आदिशक्तीबद्दलची आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
मार्स मेलविन.. विशीपूर्वीच मेलविन मार्स अमेरिकेतील सर्वांत प्रसिद्ध फुटबॉलपटू बनला. भविष्याची ददात मिटेल असा करार होण्याआधीच स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्याला देहान्ताची शिक्षा बजावण्याच्या काही सेकंद आधी एकाने ते खून केल्याची कबुली दिल्याने मेलविनची सुटका झाली. त्यामागे अनेक रहस्ये दडलेली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language